सोमवार, ४ जानेवारी, २०२१

मतभेदांनी घडलेली संस्कृती

 


 

               इतिहासकार एस. पी. मुखर्जींनी ‘व्यावसायिक इतिहासकारां’ची मर्यादा सांगत ‘नागरिक इतिहासकार’ अशी संकल्पना मांडून इतिहासकाराची तीन कार्य सांगितले आहेत. पहिले असे की, इतिहासकार मानवी समूहाला मुक्ती मिळवून देण्यात मदत करू शकतो. यामध्ये युद्ध, हिंसा यांच्याविरोधात मोर्चे काढणे आणि विद्यापीठांचे लोकशाहीकरण करण्यासाठी विद्यापीठीय राजकारणात सहभागी होणे यांचा समावेश होतो. दुसरे म्हणजे इतिहासकार आपल्या लेखणीचा वापर स्वातंत्र्याची उर्मी वाढवण्यासाठी मदत करू शकतो. तिसरे आणि शेवटचे कार्य म्हणजे इतिहासकार आपले संशोधनाचे काम चालू ठेवू शकतो. तसेच, संशोधन कौशल्ये सुधारून इतिहासाच्या माध्यमातून अर्थपूर्ण प्रश्न विचारू शकतो. प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांच्या लिखाणाचा विकासक्रम आणि शैली पाहिली तर त्यांचा विकास हा व्यवसायिक इतिहासकार ते नागरिक इतिहासकार असा झालेला दिसतो. रोमिला थापर इतिहास संशोधनासोबतच नागरी, लोकशाही आणि मानवी हक्कांच्या प्रश्नांवर सातत्याने जाहीर भूमिका घेतात. त्यामुळेच नेहमीच चर्चेत राहतात. माघील काही दिवसांपासून त्यांच्या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने चर्चेत आहेत.

           काही दिवसांपूर्वी रोमिला थापारांचे ‘व्हाईसेस ऑफ डिसेंट’ हे १६४ पानी (किंमत – ४९९) पुस्तक सेअगुल बुक्स या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले. सदरील पुस्तकाला २०१९ मधील जन आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. सध्या विरोधकांना शत्रू म्हणूनच पाहण्याचा पायंडा खोलवर रुजत आहे. तसेच, मतभेद व्यक्त करणारे, वेगळे मत मांडणारे आणि भिन्न पद्धतीने विचार करणाऱ्या मंडळींना बिरुदांच्या जुलूमशाहीने देशद्रोही, अर्बन नक्सल, खलिस्तानी ठरवले जात आहे. वेगळी बाजू, भूमिका आणि विचार करणाऱ्या नागरिकांना विरोधक म्हणून न पाहता शत्रू म्हणून पाहिले जात आहे आणि म्हणूनच नैतिक, इहवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाहीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. लोकशाहीमध्ये मतभेदांचे, वेगवेगळ्या भूमिकांचे आणि विरोधकांचे अत्यंत महत्वाचे स्थान असते. त्यांच्याशिवाय लोकशाहीची प्रक्रिया पूर्णच होवू शकत नाही. लोकशाहीप्रमाणेच भारतीय दर्शन, संस्कृती आणि इतिहासामध्येही मतभेद, विविधांगी विचार आणि वैचारिक प्रतिरोध यांना अत्यंत महत्वाची भूमिका आहे. तसेच. त्यांची चर्चा केल्याशिवाय संस्कृती, दर्शन आणि इतिहासाचे समग्र आकलन होवूच शकत नाही. भारतीय संस्कृतीची अनेकवचनी जडणघडण, दार्शनिक–धार्मिक विकासक्रमाचा चढउतार आणि सामाजिक- आर्थिक स्थित्यंतरे, ही सातत्याने प्रश्न विचारण्याच्या आणि मतभेद व्यक्त करण्याच्या द्वंद्वात्मक विरोधविकासवादी पद्धतीने घडलेली आहेत. त्यामुळे भारतीय संस्कृती, दर्शन आणि इतिहासात मतभेदांची दीर्घकालीन प्रक्रिया आणि परंपरा राहिलेली आहे. गतकाळातील मतभेदाच्या परंपरांचा वर्तमानकाळातील मतभेदांच्या व्यवहाराशी सांधेबांधणी करण्याचा प्रयत्न इतिहासकार रोमिला थापर यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

            २०१९ सालच्या उत्तरार्धात दिलेल्या ‘इतर ची उपस्थिती- आरंभकालीन भारतातील धर्म आणि समाज’ (ऑगस्ट- २०१९) आणि ‘सर्वसंगपरित्याग, मतभेद आणि सत्याग्रह’ (डिसेंबर- २०१९), या दोन भाषणांचे एकत्रीकरण करून सदरील पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदरील पुस्तक हे निबंधात्मक स्वरूपाचे आहे. त्यामुळे सदरील पुस्तकात प्रकरणे नसून प्रस्तावना आणि उपसंहारासोबत ९ विभाग आहेत. मतभेद आवश्यक आहेत का? असा प्रश्न प्रस्तावनेच्या शीर्षकात उपस्थित करत रोमिला थापरांनी समाजजीवनामध्ये, लोकशाहीमध्ये आणि भारतीय संस्कृती, दर्शन आणि इतिहासामध्ये मतभेदांचे महत्व कसे आहे आणि होते हे दाखवून दिले आहे. व्यक्तीचा व्यक्तीशी किंवा व्यक्तीचा सार्वजनिक स्तरावर काही संस्थांशी असलेल्या असहमतीचा अर्क म्हणजे मतभेद आहे असे थापर म्हणतात. तसेच, मतभेद ही आधुनिक आणि पाश्यात्य, अशा दोन्ही प्रकारची संकल्पना नाही.परंतु, मतभेद व्यक्त करण्याला अधिकाराचे स्वरूप देवून मान्यता देणे ही मात्र आधुनिक आहे. इहवादी लोकशाही समाजामध्ये प्रश्न विचारण्याची वृत्ती दाबून टाकली जात नाही तर चर्चांच्या माध्यमातून प्रोत्साहित आणि विस्तारित केली जाते. आधुनिक समाजांमध्ये मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार हा लोकांच्या भाषण स्वातंत्र्याचा भाग आहे.

           इतर समाजाप्रमाणेच भारतीय समाजही सुसंवादी आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदणारा नव्हता आणि नाहीये. आपल्यालाही असहिष्णुता, हिंसा आणि विचारांचा झगड्यांचा इतिहास वारसा व्यवहार आहे आणि म्हणूनच इतिहासात मतभेदांचे अनेक आणि विविधांगी आवाज दिसतात. प्रत्येकांची वेगवेगळी अभिव्यक्ती आहे. ऐतिहासिक स्थित्यंतरामुळे राजा- प्रजा, मालक- गुलाम हे सत्तासंबंध बदलून लोकशाहीचा विकास झाला आणि त्यातून संविधानाच्या माध्यमातून राज्य आणि नागरिक यांचा हितसंबंधी करार अस्तित्वात आला.  लोकशाहीमध्ये सर्व नागरिकांना समान हक्क असल्यामुळे मतभेदांना मान्यता मिळते आणि त्यामुळेच समाजातील ‘इतरां’चे उपस्थिती स्वीकारली जाते. भारतीय संस्कृती ही अभिजात संस्कृती होती. त्यामध्ये कोणताही संघर्ष नव्हता असे म्हणणारे लोक गुप्तपणे लोकशाहीला विरोध करतात आणि मतभेद ही पाश्चात्य समाजातून आयात केलेली गोष्ट आहे असे म्हणतात. परंतु, कोणतीही अभिजात संस्कृती ही काही नवीन शोध नसते तर ती वैचारिक – सांस्कृतिक घुसळण प्रक्रियेचा कळस असतो. कारण, सत्ता असणारे आणि मतभेद करणारे यांच्यतील संवादातूनच ती घडत असते असे म्हणत प्रस्तावनेत भारतीय दर्शनातील पूर्वपक्ष, उत्तरपक्ष आणि सिद्धांत आणि इतिहासातील संप्रदाय आणि सामाजिक स्तरांचे उदाहरण घेवून रोमिला थापर दाखवून देतात  की, धर्माचा किंवा समाजाचा इतिहास कधीही एकसाची, स्थिर आणि एकरंगी नव्हता. आधुनिकपूर्व कालखंडात धार्मिक विचार, कल्पनेच्या अभिव्यक्तीच्या माध्यमातूनच सत्तेला प्रश्नांकित केले जात होते आणि म्हणूनच आधुनिकपूर्व काळात आपणास संप्रदायांच्या माध्यमातून ‘अनेक स्व’ आणि ‘अनेक इतर’ दिसतात.

          पुस्तकातील मुख्य आशयाची ९ भागात विभागणी केली. वैदिक काळापासून ते वर्तमानकाळापर्यंतच्या मतभेदांची, वेगळेपणाची आणि इतरेपणाची चर्चा या विभागांमध्ये करण्यात आली आहे. वैदिक साहित्यातील दासीपुत्र ब्राह्मणाच्या उदाहरणावरून वैदिक काळातील सामाजिक स्तर आणि स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच, दस्यू, असुर आणि व्रात्यांची नकारात्मक पद्धतीने उपस्थिती नोंदवण्यात आलेली दिसते पण, तरीही आपणास त्यांच्या संस्कृतीचा, सामाजिक स्तरांचा आणि धर्माचा वैदिक साहित्यातून उकल होत नाही. दासीपुत्रांना वैदिक समाज रचनेत सामावून घेतले गेले असले तरी त्यांना समान स्थान मिळालेले दिसत नाही. महाभारतात महत्वाची भूमिका निभावणारा विदुर अनेक घटनांवर महत्वाचे मतभेदाचे मुद्दे नोंदवतो. पण, त्याला उच्च दर्जा मिळालेला दिसत नाही. वैदिक साहित्यात दासीपुत्राची उपस्थिती ही ‘स्व’ आणि ‘इतर’ यांच्यातील संवाद आणि मतभेदांना काही प्रमाणात सामावून घेण्याच्या प्रक्रियेचे उदाहरण आहे असे रोमिला थापर लिहिता. 

          संस्कृत व्याकरणकार पतंजलीने ब्राह्मण- समन या दोन्हींमधील झगड्याला साप-मुंगुसाच्या शत्रुत्वाची उपमा दिली आहे. सुरुवातीचे पुराण सुद्धा समन (बौध्द, जैन, आजीविक आणि काहीवेळा चार्वाक) परंपरेच्या एकदम विरोधी वाटतात. यावरून आपणास दोन्ही परंपरामध्ये किती हाडवैर असेल याची कल्पना येते. राजतरंगिणी ग्रंथात गांधार प्रांतात बौद्ध भिक्षु आणि विहारांवर हल्ले झाले असे नोंदवले आहे. तसेच, काश्मीर आणि तामिळनाडूमध्ये शैवांनी बौद्धांचा विरोध केला आहे. जैनांनाही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. समनांनी वैदिक ब्राह्मणी धर्माच्या कर्मकांडावर टीका केली. तसेच, त्यांच्या रूढी आणि कर्मकांडावर टीका केली. समनांना वैदिक ब्राह्मण धर्माने ‘नास्तिक’ म्हणून एकसाची चित्रित केले असले तरी समनांमध्येही मतभेद होते. चार्वाक परंपरेविषयी बौद्धांनी आणि जैनांनी मतभेद व्यक्त केले असले तरी चाणक्याने त्याच्या अर्थशास्त्रात चार्वाकाची उपस्थिती नोंदवली आहे. तसेच, महाभारताने ही राक्षस म्हणून चार्वाकाला चित्रित केले आहे. सलग अशी चार्वाक मताची उपस्थिती भारतीय इतिहासात नसली तरी मुघल काळापर्यंत अधूनमधून आपणास चार्वाकाच्या लोकायत मताची उपस्थिती दिसते. समनांनी मतभेदाचा भूप्रदेश विस्तारल्यामुळे वैदिक ब्राह्मणीधर्माला पुराणिक हिंदुधर्म होवून स्वतःला बदलून घ्यावे लागलेले दिसते. पुराणिक हिंदूधर्माला वेगवेगळ्या संप्रदायांच्या, पंथांच्या माध्यमातून प्रादेशिक अभिव्यक्ती निर्माण झाल्यामुळे धार्मिक व्यवहारांचे आणि विचारांचे प्रादेशिकीकरण झाले आणि त्यामुळे धर्माची पकड बसली. समनांच्या विचारांचा आणि संस्थांचा  प्रभाव पुराणिक हिंदू धर्मावर पडला. त्यातूनच बौद्धांच्या विहाराप्रमाणे ब्राह्मणांचे मठ निर्माण झाले.

             काहींचा इतरेपणा नेहमी व्यक्तींच्या किंवा गटांच्या  ‘स्व’च्या अभिव्यक्तीने निर्माण होत नाही तर एक गट दुसऱ्यावर इतरेपणा बहिष्कृतीच्या माध्यमातून लादतो आणि पुढे त्याचेच रुपांतर सामाजिक दुय्यमीकरणात होते. अनेक समाजांमध्ये श्रमजीवी समूहांना दुय्यम लेखले जाते. परंतु त्या समाजांची संपूर्ण पायाभरणी श्रमजीवी लोकांच्या मेहनातीनेच होते. म्हणूनच असे म्हटले जाते की, संस्कृतींचा संपूर्ण डोलारा हा गुलामांच्या आणि कुळांच्या श्रमावर उभा आहे. ज्यांच्यावर इतरेपणा लादला आहे अशी मंडळी म्हणजे अवर्ण, अस्पृश्य आणि आदिवासी, त्यांना सामाजिक उतरंडीच्या तळाकडे ढकलेले आहे. चांडाळ हे सामाजिक उतरंडीत अगदी खालच्या स्तराचे समजले होते. एखाद्या व्यक्तीने जर प्रस्थापित समाजनियमनांचे पालन केले नाही तर पुढच्या जन्मी सदरील व्यक्ती, कुत्रा किंवा डुक्कर किंवा चांडाळ म्हणून जन्म घेवू शकतो. अवर्णांना मतभेदाचा हक्क आणि संधीही नाही. तरीही, इतिहासात काही अवर्ण मतभेद नोंदवतांना दिसतात आणि जनमनावर पकड बसवतात. त्यामुळेच त्यांना समावून घेतलेले दिसते. कृषीच्या विस्तारासोबत आणि जंगलतोडीमुळे आदिवासींना दूरवर रेटले गेले किंवा काहींवर दुय्यमत्व लादले गेले. परंतु, आपल्या पराक्रमामुळे काही आदिवासी महत्वाचा दर्जा मिळवतात. उदा. राजपूत दरबारात भिल्ल प्रमुखांचे महत्व. 

              मध्ययुगात भक्तीकेंद्री पंथ, मत आणि संप्रदायांनी पुराणिक हिंदूधर्म आणि इस्लामपासून फारकत घेवून वेगवेगळ्या प्रकारच्या ‘स्व’ आणि ‘इतर’ची निर्मिती केली. त्या सगळ्यांना ‘हिंदू’ आणि ‘मुस्लीम’ या चौकटीमध्ये अडकवणे हे अनैतिहासिक ठरेल. तसेच, तत्कालीन समाजातील बारकावे, संधीग्धता आणि शीर्षकांचे विश्व आपल्याकडून दुर्लक्षित होईल. वारकरी, महानुभाव, लिंगायत, खोजा, मोपला, आणि कबीरपंथी अशा सर्वांच्या ‘इतरां’चे अनेक ‘स्व’ हिंदू- मुस्लीम बिरुदावलीमुळे नाकारले जातात. म्हणूनच, शब्द, संकल्पना आणि बिरूद ची चर्चा करतांना ऐतिहासिक संदर्भ, काळ आणि स्थिती लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे. म्लेच्छ, यवन, शक, तुर्क या शब्दांची बरीच चर्चा रोमिला थापरांनी पुस्तकात केली आहे. तसेच, महम्मद तुघलकविषयीचे काकतीय चित्रण आणि राजपूत चित्रण वेगवेगळे कसे आहे हेही दाखवले. अठराव्या शतकात बंगाली महाराष्ट्रपुराणात मराठ्यांना गाई-ब्राह्मणांची हत्या करणारे असे म्हटले आहे अशी नोंद थापरांनी केली आहे.

            सामंतशाहीच्या अंतामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे वासाहतिक काळखंडात नागरिक ही संकल्पना विकसित झाली असली तरी नागरिकांना आवश्यक असलेल्या स्वातंत्र्याची उणीव होती. ब्रिटीशांचे राज्य हे कायद्याचे राज्य आहे असे म्हणत नैतिक सत्ता गाजवण्याचे काम केले जात होते. अशा पार्श्वभूमीत असहकार आणि सविनय कायदेभंग अशा शब्दांचे राजकीय ग्रंथालय सत्याग्रहासाठी गांधींनी उभे केले. गांधींचा खादीचा आग्रह हा नुसता आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न नव्हता तर तो नैतिक विरोध निर्माण करण्याचा मुद्दा होता. समन परंपरा, भक्ती आणि वसाहतवादविरोधी राष्ट्रवाद अशा व्यापक चौकटीत गांधींच्या सत्याग्रहाला समजून घेण्याचा अतिशय उत्तम प्रयोग रोमिला थापरांनी केला आहे. पुस्तकाच्या शेवटी म्हणजे उपसंहारात इतिहासातील मतभेदांचे वेगवेगळे आवाजांची आठवण आजच्या संदर्भात करायला हवी का? असा प्रश्न रोमिला थापर उभ्या करतात. नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात प्रतीरोधाचे प्रतिक म्हणून प्रसिद्धीस आलेल्या शाहीनबागला रोमिला थापरांनी भेट दिल्यावर तेथील तरुणांचा उत्साह पाहून त्यांना त्यांच्या १९४० दशकातील वसाहतवादविरोधी राष्ट्रवादी चळवळीची आठवण झाली आहे. सविनय कायदेभंग हा एक मतभेदाचा नुसता वसाहतवादविरोधी प्रकार नव्हता तर ती एक असहकाराची कृती आहे. वसाहतपूर्व काळात मतभेदांचे महत्व माहिती होते आणि अजूनही ते ठीकून आहे. आपण, सरकार आणि नागरिक म्हणून त्याच्याशी बोलू शकतो. इतिहासकार होराल्ड जीन म्हणतात की, ‘जगात युद्धे, जनसंहार आणि गुलामी यांच्यासारख्या भयानक गोष्टी असहकारातून नव्हे तर लोकांच्या सहकारातून निर्माण झाल्या आहेत.’ म्हणूनच सर्वांनी रोमिला थापरांनी मांडलेल्या मतभेदांच्या वंशावळीचा इतिहास आपण आवर्जून वाचला पाहिजे.

                                                                                           


पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता, २ जानेवारी २०२१ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

महात्मा फुले आणि विधवांची स्थिती, केशवपन व बालहत्या प्रतिबंधक गृह

  प्रश्न. निर्दयी काय आहे? उत्तर – दगाबाज मनुष्याचे हृद्य प्रश्न – त्यापेक्षाही निर्दयी काय आहे? उत्तर – स्त्रीचे हृद्य प्रश्न – स...